चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव होता; तांबेंचा नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल

satyajeet tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेले आणि त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर परखड भाष्य केलं असून कॉंग्रेसमधील नेत्यांवर तोफ डागली आहे.

नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला.

माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही त्यांनी केला. मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आलं असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केलं. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.

गेले 20-25 दिवस आपण नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं राजकारण झालं. त्यावर खरंतर, अनेकांनी मला प्रश्न विचारले गेले. त्याबाबतीत भूमिका मांडायची होती. अनेक आरोप आमच्या परिवारावर झाले. आपण ज्या पक्षात आयुष्यभर राहिलो. मी अनेकवेळा सांगितलं की, आमच्या कुटुंबाला 2030 साली काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होताहेत. किती निष्ठेनं आम्ही या पक्षात काम केलंय, हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला असं देखील तांबे यांनी म्हटले आहे.