कुणी कमी थंडीतही गारठतं, तर कुणाला थंडीच वाजत नाही; वाचा त्यामागचं वैज्ञानिक कारण

Scientific Reason behind Cold: भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या टी-शर्टची (T-Shirt) जोरदार चर्चा होत असून कडाक्याच्या थंडीनंतरही राहुल गांधी हाफ टी-शर्ट घालूनच कसे फिरत आहेत, असा सवाल सर्वजण करत आहेत. अखेर राहुल गांधींना थंडी का जाणवत नाही, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की नेमकी थंडी कशी वाजते आणि काहींना जास्त तर काहींना कमी का वाटते? चला तर मग आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पद्धतीने सांगतो…

कोणालाही थंडी कशी वाजते?
माणसाला थंडी कशी वाजते? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर शरीरात त्वचेखाली थर्मो-रिसेप्टर नसा (Thermo-receptors Nerves) असतात, ज्या मेंदूला थंडीचा संदेश देतात. यानंतर, मेंदूतील हायपोथालेमस (Hypothalamus) शरीराचे तापमान संतुलित करण्यास सुरवात करतो. त्यामुळे कधी कधी थंडीमुळे अंगावर काटा येतो (Goosebumps) आणि केस उभे राहतात किंवा स्नायू आकुंचन पावू लागतात. या कारणामुळे एखाद्याला थंडी जाणवते.

काहींना थंडी जास्त तर काहींना कमी का वाजते?
एका अभ्यासानुसार, कमी किंवा जास्त थंडी वाजणे हे पूर्णपणे लिंग, वय आणि जनुकांवर अवलंबून असते. यावरून माणसाला किती थंडी जाणवेल हे ठरते. प्रत्येकाची तापमान सहन करण्याची आणि थंडी जाणवण्याची क्षमताही वेगळी असते. वृद्धांना थंडी कमी वाटते, तर तरुणांना जास्त थंडी जाणवते, असा दावाही एका अभ्यासात करण्यात आला आहे.

एका संशोधनात असे म्हटले गेले आहे की, तापमान खूप कमी होईपर्यंत वृद्ध लोक थंडीने थरथर कापत नाहीत, तर तरुणांना तापमान थोडेसेही कमी झाले की थरकाप सुरू होतो. कारण, वृद्धांच्या तुलनेत तरुणांमध्ये थंडी जाणवण्याची क्षमता अधिक असते, जी वयानुसार हळूहळू कमी होत जाते.

थंडीत शरीर का थरथरते?
वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर मेंदूतील हायपोथॅलेमस शरीराचे तापमान संतुलित करण्यास सुरुवात करतो आणि यावेळी शरीराचे अवयव संथ गतीने काम करतात. त्यामुळे शरीरात अधिक चयापचय उष्णता निर्माण होते आणि शरीरात थरथर सुरू होते. शरीर थरथरणे म्हणजे तुमचे शरीर अंगातील तापमान आणि बाहेरचे तापमान संतुलित करत आहे. तापमान संतुलित झाल्यानंतर थरथर थांबते किंवा कमी होते.

कोणत्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला खूप थंडी जाणवते?
जास्त थंडी जाणवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीराचे वजन लांबीच्या प्रमाणात खूपच कमी असल्यास थंडी जास्त जाणवते. याशिवाय शरीरात लोहाची कमतरता आणि थायरॉईड बिघडल्यानेही थंडी वाजू शकते. शरीराच्या सर्व भागांमध्ये योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळे तीव्र थंडी जाणवू शकते. याशिवाय योग्य झोप न लागणे, डिहायड्रेशन आणि व्हिटॅमिन बी ची कमतरता हे देखील जास्त थंडी वाजण्याचे कारण असू शकते.

राहुल गांधींना थंडी का वाजत नाहीये?
अतिशय थंड ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे शरीर त्या वातावरणानुसार ऍडजस्ट होते. याशिवाय शारीरिक हालचाल चांगली असेल तर शरीरातील चयापचय क्रिया चांगली राहते आणि थंडी कमी वाजते. आपल्या शरीरातील चरबीही आपल्याला थंडीपासून वाचवते. राहुल गांधी दीर्घकाळ भारत जोडो यात्रेत सहभागी असून त्यांच्या शरीराने बाह्य वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. याशिवाय ते दररोज चालत आहेत आणि चांगल्या शारीरिक हालचालींमुळे त्यांना थंडी कमी वाजत असावी.