फुटबॉलच्या मैदानापेक्षाही लहान आहे ‘हा’ देश, जाणून घ्या जगातील सर्वात छोट्या देशाबाबत

Sealand Smallest Country: जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी (Vatican City) नाही, तर समुद्राच्या मध्यभागी एक छोटासा भाग आहे, जो उत्तर समुद्रात स्थित सीलँड (Sealand) म्हणून ओळखला जातो. नावावरूनच कळते की, ही चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली जमीन आहे. मात्र व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश असला तरी, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. दुसरीकडे, सीलँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील हा एकमेव देश आहे; जिथे आजवर कोविड 19 चा एकही रुग्ण आढळला नाही.

सीलँड हे ब्रिटीशांनी दुसऱ्या महायुद्धात (Second World War) बांधले होते. सैन्य आणि नौदलाचा किल्ला म्हणून त्याचा वापर केला जात असे. सीलँड ब्रिटनच्या पाण्याच्या सीमेबाहेर स्थित होते, म्हणून युद्ध संपल्यानंतर ते पाडले जाणार होते. परंतु युद्धानंतरही सीलँड नष्ट झाले नाही. सीलँड फुटबॉल मैदानापेक्षाही लहान आहे, फक्त 4000 चौरस मीटर. त्याचा प्लॅटफॉर्म रफ टॉवर म्हणून ओळखला जातो.

दुस-या महायुद्धात बनवले सीलँड
एचएम फोर्ट रफ्स हे ब्रिटन सरकारने 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्याच्या मॉन्सेल किल्ल्यांपैकी एक म्हणून बांधले होते. हे प्रामुख्याने आसपासच्या बरोमधील महत्त्वाच्या शिपिंग लेनपासून संरक्षण म्हणून उभारले गेले. जर्मन खाण टाकणाऱ्या विमानाविरुद्धही ते उपयुक्त ठरले. या मॉन्सेल किल्ल्यांना 1956 मध्ये सेवामुक्त करण्यात आले.

सीलँडचा मालक कोण आहे?
पॅडी रॉय बेट्सने 1967 मध्ये सीलँड ताब्यात घेतला. त्यांनी पायरेट रेडिओ चॅनेलद्वारे त्यावर दावा केला आणि त्याला सार्वभौम देश घोषित केले. तथापि, गेल्या 54 वर्षांपासून ते युनायटेड किंगडम सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे. सीलँड एक विवादित लहान राष्ट्र आहे.

ब्रिटीश कामगारांनी 1968 मध्ये सीलँडच्या प्रिन्सिपॅलिटीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बेट्सने इशारा म्हणून काही गोळ्या झाडून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याला ब्रिटनच्या न्यायालयाने समन्स बजावले होते. मात्र त्याला शिक्षा झाली नाही कारण त्याचा गुन्हा, देशाच्या प्रादेशिक पाण्याच्या 3 नॉटिकल मैल मर्यादेच्या बाहेर होता आणि त्यामुळे केस पुढे जाऊ शकली नाही.