राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंना आणखी खासदाराचे पत्र

मुंबई – मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) पत्र लिहिलं आहे. १८ जुलैला होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

दरम्यान, शेवाळे यांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit)यांनी केली आहे.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आदिम जमातीतील आदिवासी महिला द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. हे पत्र 6 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील आणि प्रख्यात अर्थतज्ञ स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या काही जरी असलं तरी मोठं मन करुन तसाच पाठिंबा स्वातंत्र्यानंतर पहिल्या आदिवासी महिलेला मिळालेला या सर्वोच्च पदासाठी द्यावा. यामुळे संपूर्ण आदिवासी समाज उद्धव ठाकरे यांचं मनापासून स्वागत करेल, असं गावित यांनी पत्रात म्हटलं आहे. मला आशा आहे उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी आशा देखील गावित यांनी व्यक्त केली.