जिथं तुमचं सरकार आहे तिथं काय दिवे लावले ते पहा, राम सातपुतेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार!

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून अनेक बडे नेते गोव्यात प्रचारासाठी हजेरी लावत आहे. शिवसेनेने देखील गोव्यात जोरदार ताकद लावली. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यात जंगी सभा घेतली

यासभेत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गोव्यात अजुनही लोडशेडींग, पाणी, प्रवासाच्या मूलभूत सुविधांना वंचित रहावे लागले आहे. त्यामुळेच मुंबई, महाराष्ट्रासारखाच गोव्याचाही विकास करणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नावरून भाजप आमदार राम सातपुते यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. ‘आज गोव्यात महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे वीज प्रश्नाबाबत बोलत होते, महाराष्ट्रात तुमच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली,शेतकऱ्यांना लाईट भेटत नाही आणि हे गोव्यात लोडशेडिंग आहे म्हणून भाषण ठोकत आहेत. आधी जिथं तुमचं सरकार आहे तिथं काय दिवे लावले ते पहा’. असा जोरदार टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.