संतांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा; उद्धव ठाकरेंकडे वारकऱ्यांची मागणी

पुणे- प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकरी सेनेने गंगासागर येथे घेतली आहे.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. सोबतच अंधारे यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.