बँकेची पंधरा लाखांची रक्कम लुटणारे सात जण गजाआड; ‘या’ व्यक्तीने दिली होती टीप

जालना- रहदारीच्या रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला मारहाण करून पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची घटना 26 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सात आरोपींना गजाआड केले आहे. आठवा आरोपी फरार असून त्याच्याकडे मोठी रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे .दरम्यान बँकेच्या शिपायाने त्याच्या मित्राला टीप देऊन हा सर्व प्रकार घडवून आणला आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जालना अंबड रस्त्यावर गोलापांगरी येथे एक शाखा आहे. या शाखेचे व्यवस्थापक सुभाष गोडबोले हे नेहमीप्रमाणे जालना येथील मुख्य शाखेतून शेतकऱ्यांच्या अनुदानाची पंधरा लाख रुपये रक्कम दिनांक 26 रोजी गोलापांगरी येथे घेऊन जात होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गोलापांगरी जवळील इंग्रजी शाळेसमोर दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी मारहाण केली आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम पळवली. महामार्गावर आणि सकाळी वाहतुकीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि कामालाही लागली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला .

हा तपास करत असताना जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जालना शहरातीलच सतकर कॉम्प्लेक्स शाखेत सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या सुदर्शन कमाने याचा यामध्ये हात असल्याचा सुगावा त्यांना लागला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने त्याचा सारवाडी येथे राहणारा मित्र शत्रुघ्न उर्फ बबन गायकवाड याला ही माहिती दिली होती, आणि मुख्य शाखेतून सुभाष गोडबोले हे शाखाधिकारी नेहमी अशा प्रकारची रोकड घेऊन जातात असेही सांगितले होते. त्यानुसार बबन गायकवाड याने ्याच्या काही सहकार्यांच्या मदतीने यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही.हे उघड झाले आहे.

26 11 ला केलेला प्रयत्न यशस्वी झाला मात्र पोलिसांच्या तपासात पुन्हा या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. सुदर्शन कमाने आणि बबन गायकवाड यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बबन गायकवाड याने या सर्व प्रकरणाची कबुली दिली, तसेच सराईत गुन्हेगार गजानन सोपान शिंगाडे, वय 32 राहणार पाचन वडगाव तालुका जालना, करणसिंग छगनसिंग भोंड, 28. अर्जुनसिंग छगनसिंग भोंड, 23. कंवरसिंग छगनसिंग भोंड, 20. आणि सुनील उर्फ वैजनाथ भुतेकर 22, सर्वजण राहणार लोधी मोहल्ला जालना यांनी केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून लुटलेल्या रक्कमपैकी एक लाख 20 हजार आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या मोटरसायकल असा एकूण दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे आणि त्याच्याकडे सुमारे बारा हजारांची रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस या आठव्या आरोपीचा शोध घेत आहेत. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, दुर्गेश राजपूत, कृष्णा तगे, गोकुळसिंग कायटे, सचिन चौधरी, कैलास चेके, सॅम्युअल कांबळे, महिला पोलीस कर्मचारी चंद्रकला शडमल्लू, गोदावरी सरोदे, रेणुका बंडे, यांनी पूर्ण केला.
या तपासा बद्दल अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे