“बीसीसीआय डरपोक आहे, भारतात पाकिस्तानने विश्वचषक जिंकणे त्यांच्या तोंडावर चपराक असेल”

Shahid Afridi On BCCI : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे (Shahid Afridi) बोल पुन्हा एकदा बिघडले आहेत. 2023 च्या विश्वचषकाबाबत त्याने लज्जास्पद विधान केले आहे. आफ्रिदीने बीसीसीआयवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. भारतात जाऊन विश्वचषक जिंकणे ही बीसीसीआयच्या तोंडावर चपराक असेल, असे तो म्हणाला आहे. 2023 क्रिकेट विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे.

क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, शाहिद आफ्रिदी म्हणाला, “मला समजत नाही की ते (पीसीबी) इतके ठाम का आहेत आणि आम्ही भारतात जाणार नाही असे का म्हणत आहेत. त्यांनी परिस्थिती सोपी करून एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, ते सकारात्मकपणे घ्या, जा आणि खेळा. पाकिस्तानी खेळाडूंना ट्रॉफी घरी आणण्यास सांगा, संपूर्ण देश तुमच्या मागे आहे. हा आमच्यासाठी मोठा विजय तर असेलच पण बीसीसीआयच्या तोंडावरही मोठी चपराक असेल.”

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आफ्रिदी पुढे म्हणाला की, “पीसीबीकडे त्यांच्या प्लेटमध्ये बरेच पर्याय नाहीत, म्हणून त्यांनी जे शक्य आहे आणि त्यांच्या आवाक्यात आहे ते केले पाहिजे.”

“भारतात जा, सभ्य क्रिकेट खेळा आणि विजयाचा दावा करा. हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे. आम्हाला तिथे जायचे आहे, विश्वचषक घेऊनच येथे परत येऊ असा स्पष्ट संदेश त्यांना द्यावा लागेल. आम्ही जगण्यासाठी कुठेही जाऊ शकतो, मरणाला घाबरत नाही आणि कधी घाबरणार देखील नाही. भारतीय संघ आणि खास करून बीसीसीआय डरपोक आहे. भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित आहे”, असे विचित्र आणि कुठल्याही तर्काला आधारून नसलेले विधान त्याने केले.