जिथं सत्ता नव्हती तिथं आणली गेली, शरद पवारांचा भाजपवर प्रहार

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर यांनी केलीय. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने आज देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते.

अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. शिक्षणासाठी 100 कोटी घेतले तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली. नंतर ती रक्कम 4 कोटी झाली, नंतर 1 कोटी झाली, अशा शब्दात पवार यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवला.