ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यावर पक्षातील नेत्यांना योग्य ती समज देण्यात आली : शरद पवार

पुणे: एखाद्या नेत्याच्या वक्तव्याबद्दल समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, गैरसमज होऊ शकतो, तो दूर करणे ही आपली जबाबदारी आहे. ब्राह्मण समाजाविषयी आपल्या सहकाऱ्यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांना योग्य ती समज देण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी बोलवलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, मी पक्षातील नेत्यांना समज दिली आहे. त्यापेक्षा अधिक मी काही करू शकणार नाही. राज्यात वातावरण खराब झालं असं मला वाटत नाही. मात्र, जबाबदार पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांना काही वर्ग अस्वस्थ होऊ शकतो. अशावेळी जाणकारांनी चर्चा करून ती अस्वस्थता कमी केली पाहिजे.

ज्या पद्धतीने विविध जाती-धर्मासाठी महामंडळ अस्तित्वात आहे, त्याचपद्धतीने बाह्मण समाजासाठी ‘परशुराम’ महामंडळ असावे अशी मागणी बाह्मण संघटनांनी केली. यावर त्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याचे स्पष्ट केले. मात्र याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून संघटना आणि मुख्यमंत्री यांची चर्चा घडवून आणू शकतो असेही पवार यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून ब्राह्मण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे दुषित झालेलं वातावरण निवळण्याचा आणि काहीशी साखरपेरणी करण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून झाला असल्याची प्रतिक्रिया काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठक संपल्यानंतर देण्यात आली.