पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल इतका नाही, शरद पवारांनी घेतला धाडसत्राचा समाचार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालय आणि घरावर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. या धाडसत्राचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल, इतका पाहुणचार घेऊ नये. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून अठरा सरकारी पाहुणे बसलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनाही घरी जायचे आहे, पण त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना वरून आलेल्या नाहीत. याआधी देखील केंद्रीय यंत्रणेनी घरी जाऊन चौकशी केलेली आहे. पण इतक्या दिवस ठाण मांडून बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीही आमची याबाबत काही तक्रार नाही असेही शरद पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवरच होतोय, असे नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करुनही पाडता आले नाही म्हणून नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करायचा नाही हे संस्कार आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घेतले आहेत असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.