NCP Sharad Pawar :– राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असतं. या नियमानुसार महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या 2-3 महिन्यांत विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र विधानसभेवेळी महाराष्ट्रात पाहायला मिळेल. परंतु यंदा विधानसभेला महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला कौल. यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष, त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढलाय. त्यादृष्टीने शरद पवार राज्यात सत्ताबदलाचे वातावरण तयार करत आहेत. शरद पवारांनी नुकताच महाविकास आघाडीला विधानसभेत 225 जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केलाय. पण मुळात शरद पवार कोणत्या बेसिसवर इतका मोठा दावा करतायत?, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राज्यातील सद्यस्थिती कशी आहे?, त्यांची ताकत आणि त्यांच्या कमकुवत बाजू कोणत्या आहेत?, आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतं? याबद्दल आपण या लेखात सविस्तर माहिती घेणार आहोत.
या लेखाची सुरुवात करुया 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील कांमगिरीपासून.. मागील विधानसभा निवडणुकीत आपण 145 ची मॅजिक फिगर गाठू असा विश्वास भाजपाला होता. पण 2014 मध्ये 122 जागा मिळवणाऱ्या भाजपाने 2019 ला केवळ 105 जागा आल्या. तर शिवसेनेने 56 आणि काँग्रेसने 44 जागा मिळवल्या. मात्र या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी कानामागून आला नि तिखट झाला अशी होती. राष्ट्रवादीने कांटे की टक्कर देत 54 जागा जिंकल्या. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये राष्ट्रवादीला 13 अतिरिक्त जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादीची मागील विधानसभा निवडणुकीतील कामगिरी दमदार राहिली. महायुतीचे सरकार स्थापन होईल असे वाटत असताना शरद पवारांनी डाव टाकला आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हे सरकार गेले आणि पुढे अजित पवारांनी देखील बंडाचे निशाण फडकवत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी राष्ट्रवादीला तरुणांच्या हाती सोपवावं, अशी टीका करत अजित पवारांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना काही अर्थाने यशदेखील आलं. पुढे अजित पवारांनी स्वतची वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचं नाव व निवडणूक चिन्हावरच दावा ठोकला. राष्ट्रवादीचे कर्तेधर्ते शरद पवारांना अजित पवारांच्या बंडामुळे मोठा धक्का बसला. मात्र इतक्या सहज पराभव स्वीकारतील ते शरद पवार कसले ? या कठीण काळात संघर्षाचा बाणा दाखवत त्यांनी खिंड लढवली. ही लढाई सुरू असताना यादरम्यान लोकसभेचे बिगूल वाजले आणि निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादीची ओळख असलेले पक्ष चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला देऊ केले. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. कारण आता त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार होती. जवळपास वयाची 50 वर्षे घड्याळ हाती बांधणारे शरद पवार तुतारी या निवडणूक चिन्हासह 2024च्या लोकसभेत उतरले. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि राजकारणातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी मोजकेच पण तगडे उमेदवार मैदानात उतरवले. तब्येत साथ देत नसतानाही गावोगावी दौरे केले. यावेळी पहिल्यांदाच स्वबळावर लोकसभा लढवणारे अजित पवारही जोरदार तयारी करत होते. शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार अशी थेट लढतही झाली. स्वत: प्रत्येक मतदारसंघात जाऊन अजितदादांनी प्रचार केला. केंद्रातील मोठ्या चेहऱ्यांना अजितदादांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही बोलावलं. पण गद्दारीचा ठपका बसल्याने अजित पवार लोकसभा निकालावेळी सपाटून खाली आपटले. तर दुसरीकडे सहानुभूतीच्या जोरावर शरद पवारांनी 10 पैकी ८ उमेदवार निवडून आणले.
लोकसभेत गेमचेंजर ठरलेल्या शरद पवारांनी आता विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तरीही आतापर्यंत शरद पवारांनी २ तरुण चेहऱ्यांची घोषणा केलीय. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील आणि अहमदनगमधील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे या तरुण उमेदवारांना मैदानात उतरवंलय. त्यामुळे शरद पवार यंदा नव्या स्ट्रॅटेजीसह विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. याव्यतिरिक्त गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिकचं सक्रिय राजकारण, लोकमताचा अंदाज ओळखण्याची हातोटी, फिडबॅक घेण्याची ग्रांउडची यंत्रणा, पक्षफुटीमुळे जनतेतील सहानुभूतीची लाट हे फॅक्टर्स विधानसभेला शरद पवाराच्या राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडाताना दिसू शकतात. तसेच नकळतपणे भाजपा नेत्यांची टीकाही राष्ट्रवादीसाठी फायद्याची ठरताना दिसतेय. भाजपातील वरिष्ठ नेते शरद पवारांवर सातत्याने पातळी सोडून टीका करत आहेत. परंतु जनतेला ही टीका रुचत नसल्याने भाजपाचा मतदारवर्ग शरद पवारांच्या बाजूने वळताना दिसतोय. पण असे असले तरीही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कमकुवत बाजूही त्यांना खाली खेचू शकतात.
शरद पवारांची ताकद असलेले जेष्ट नेते अजित पवारांबरोबर गेलेत. प्रफुल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदींनी साथ सोडल्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला कुशल मनुष्यबळाची कमतरता भासेल. तसेच राष्ट्रवादीत उरल्यासुरलेल्या नेत्यांमध्येही गटबाजी पाहायला मिळतेय. अनुभवी जयंत पाटील आणि नवखे रोहित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. याचा फटका कुठे ना कुठे पक्षाला बसू शकतो.
याशिवाय शरद पवारांच्या पक्षाची ताकद 2-3 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यापुढे महाराष्ट्र व्यापी नसलेला राष्ट्रवादी पक्ष दुबळा सिद्ध होऊ शकतो. मात्र वस्ताद हा वस्ताद असतो हे वेळोवेळी दाखवून देणारे शरद पवार या विधानसभा निवडणुकीत राखीव डाव टाकत विरोधकांना अस्मान दाखवणार याबद्दल त्यांच्या समर्थकांना विश्वास वाटतो. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी अद्भुत कामगिरी करेल का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.