सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत शशी थरूर म्हणाले….

नवी दिल्ली-  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (shashi tharoor) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या लोकसभेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल (Viral video)  होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर थरूर यांनी गुरुवारी सांगितले की ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे एका प्रश्नावर चर्चा करत होते. हा व्हिडिओ मंगळवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq abdullah ) सभागृहात बोलत आहेत आणि त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसात बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत.

यानंतर थरूर यांनी आता ट्विट करून म्हटले आहे की,  जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संक्षिप्त संभाषणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या मला धोरणाशी संबंधित प्रश्न विचारत होत्या कारण त्या पुढील वक्त्या होत्या. फारुख साहेबांना (त्या वेळचे वक्ते) त्रास होऊ नये म्हणून सुप्रिया हळूच बोलत होत्या. त्याचं बोलणं (सुप्रिया) ऐकण्यासाठी मी झुकलो होतो.

यानंतर थरूर यांनी अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा संदर्भ देत ट्विट केले. त्यांनी लिहिले की,कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना ,कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!