राज्यपाल नियुक्त विधिमंडळ सदस्यांच्या यादीतून वगळावे यासाठी  शेट्टी घेणार राज्यपालांची भेट 

कोल्हापूर : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ( Raju Shetty )आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत ही घोषणा केली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर (Swabhimani )  लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप ( BJP ) सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, याबाबत स्वभिमानीचे रणजीत बागल यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी कोल्हापूर येथे पार पडली.भाजपकडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय व शोषण याच कारणासाठी आम्ही महाविकास आघाडीत सामिल झालो होतो,मात्र महाविकास आघाडी सरकारकडुन शेतकर्‍यांचा विश्वासघात करण्यात आला,शेतकर्‍यांच्या हक्काच्या एफआरपी अर्थात ऊसदराचे तुकडीकरण करण्याचे पाप या महाविकास आघाडी सरकारने केले,ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना विजेसाठी झगडावे लागले. जर या सरकारकडुन राज्यातील शेतकर्‍यांच्या बाबतीत वारंवार विरोधी भुमिका घेतली जात असेल तर या सरकारसोबत राहण्यात आम्हाला देखील कोणताही रस नाही.

राज्य व केंद्र या दोन्ही सरकारकडुन शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे, राज्यातील शेतकर्‍यांना एक सक्षम व त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे लढणारा तिसरा पर्याय आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणुनच आम्ही आता एकला चलो रे ची भुमिका घेतलेली आहे. शिवाय लवकरच राजू शेट्टी साहेब हे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवुन संभाव्य राज्यपाल नियुक्त विधिमंडळ सदस्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, अशी विनंती ते राज्यपाल महोदयांना करणार आहेत.असं देखील त्यांनी सांगितले.