शिंदे गटाच्या मंत्र्याची ‘दादा’गिरी, पोलिसांपुढेच शिवीगाळ करत कानशिलात मारली; Video Viral

मालेगाव- बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओ दादा भुसे चक्क एका व्यक्तीला शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे कृत्य त्यांनी चक्क पोलिसांसमोर केले आहे. एका लोकप्रतिनिधीने कोणत्याही कारणावरुन कोणालाही मारहाण करणे चुकीचे असते. तरीही दादा भुसे पोलिसांसमोर अशी कृती करताना व्हिडिओत दिसत (Dada Bhuse Viral Video) आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे. मालेगावमधील लाखोंची गर्दी पाहून काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरून दोघां संशयितांना पोलिसांनी पकडले होते.

यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र पुन्हा तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते. यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकाच्या श्रीमुखातही भडकवली असल्याचे व्हायरल व्हिडिओ दिसून आले आहे. यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते.

मंत्री दादा भुसे यांचे व्हायरल व्हिडिओ बघता दादा भुसे आक्रमक का होतात? पोलीसांच्या कामगिरीवर भुसे समाधानी नाहीत का? दादा भुसे यांना दबंगगिरी करायची असते का? अशी चर्चा आता नाशिक जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू आहे.