भाजपच्या सराईत गुन्हेगारांना शिंदेसरकार पाठीशी घालतेय; विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप

मुंबई – कल्याण – डोंबिवलीमध्ये महिला अत्याचार व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामागे भाजपच्या नेत्याचा हात असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पोस्कोअंतर्गत कारवाई आणि तडीपारी असताना भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्याचा भाऊ कुंदन माळी हे हैदोस घालून दहशत निर्माण करत आहेत मात्र त्यांना पोलीसही पाठिशी घालत आहे असा थेट आरोपही चव्हाण यांनी केला.

डोंबिवलीतील प्रल्हाद नारायण पाटील यांनी १० सप्टेंबर २०२२ रोजी सराईत गुंड संदीप माळी व कुंदन माळी यांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडीओ करुन कुणामुळे आत्महत्या करत आहे हे स्पष्ट केले होते त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही असेही चव्हाण म्हणाल्या.

सराईत गुन्हेगार संदीप माळी व कुंदन माळी या गुन्हेगारांना शिंदे सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे. लहान शाळकरी मुलींवर अत्याचार केल्यानंतर संदीप माळीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र या गुन्ह्यात त्याला जामीन कसा मिळाला असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.

ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ब्रम्हा माळी यांना खंडणीसाठी याच लोकांच्या गुंडांनी मारहाण केली मात्र त्यांना अटक करण्याऐवजी ब्रम्हा माळी यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केली. याबाबत तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. राज्याचे गृहखाते करतेय काय? भाजप पदाधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय? असा संतप्त सवालही चव्हाण यांनी केला.

संदीप माळी व कुंदन माळी हे दाखलेबाज गुंड असून त्यांना तडीपार करण्यात आलेले असताना ते गुंड गावात येवून हैदोस घालत आहेत. पोलीसही या गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे. प्रल्हाद पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी संदीप माळी व कुंदन माळी यांच्यावर कारवाई झाली असती तर त्याला आत्महत्या करावी लागली नसती असे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यावेळी म्हणाले.