शिंदे-शाह-फडणवीस भेटीत मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी उशिरा दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत पोहोचले. यादरम्यान ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत.

शुक्रवारी राजधानीत पोहोचल्यानंतर दोन्ही नेते महाराष्ट्र सदनात पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही वेळाने शिंदे तेथे गेले. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील सत्तावाटपाच्या सूत्राभोवती अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे मानले जाते.दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्तारानं चर्चा झाली. राज्याचे नवे गृहमंत्रीपद कुणाला मिळणार यावर देखील या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंनी आपल्या गटासाठी आठ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचीही माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळातील एकूण ४३ मंत्र्यांपैकी ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केली. तर राहिलेली २९ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव शिंदे गटाने दिला आहे.