शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली-  पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठे यश मिळाले आहे. शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (डीएसजीएमसी) निवर्तमान अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

बुधवारीच त्यांनी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर अकाली दल सोडण्याचा निर्णय घेतला होता. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी शेखावत म्हणाले की, सिरसा यांचा पक्षात समावेश केल्याने राज्यातील पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकीत नक्कीच मदत होईल.

दरम्यान, संसदेने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले जे आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. दिल्लीत अकाली दलाला जे काही समर्थन आहे त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत सिरसा यांनी पक्ष सोडणे हा पंजाबपासून दिल्लीपर्यंत अकाली दलाला मोठा धक्का आहे.