सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर भोंगा प्रकरणावरुन राज ठाकरेंना शिवसैनिकांचाही पाठिंबा

मुंबई – राज्यात सध्या भोंग्यांचा मुद्दा चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray) यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे यांना पाठींबा मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या(The Economic Times) वृत्तानुसार, अनेक जुने शिवसैनिक राज ठाकरेंशी सहमत आहेत. राज ठाकरेंनी मशिदींमधून लाऊडस्पीकर (Loudspeaker) खाली उतरवणे आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. यापूर्वी हे मुद्दे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे आता तळागाळातील शिवसैनिकांना राज ठाकरेंच्या भूमिकेशी असहमत दर्शवणे कठीण जात आहे. अशा स्थितीत राज्याच्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

“आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता? बाळासाहेब नेहमी याच मुद्यावर राहिले. राज यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता,” असे मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला ९९ टक्के पाठिंबा असल्याचा दावा काही सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.