मुंबई :  भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांकडून तोडफोड

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आज एक संतापजनक घटना समोर आली आहे.  मुंबईतील कांदिवली होणाऱ्या भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी तोडफोड केली. संबंधित परिसरातील शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा स्टेज उद्ध्वस्त केला. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी आज भाजपने या सभेचं आयोजन केलं आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या पोल खोल सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचे काम करु करण्यात आलं होतं. मात्र रात्री एकच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि भाजपच्या सभेच्या स्टेजची तोडफोड करुन ते बाजूला ठेवलं.

या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.  सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. याशिवाय पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलखोल होऊ लागल्याने आता सेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.