गेली ५० वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे – राऊत

वाशीम – महाराष्ट्रात तीन पक्षांचे ठाकरे सरकार (Thackeray Government) अस्तित्वात येत नाही तोच भाजपाच्या (BJP) नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे सरकार आज जाणार, उद्या पडणार असे अनेकदा सांगितले जात होते. आजही दररोज नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agencies) महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री, नेते, मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आहे, अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा भविष्यवाणी केली आहे.

जूनआधी मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे जाणार : नारायण राणे

आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळं येतात. या वादळात हलणारी झाडं फांद्यासकट कोसळून पडतात. त्याच प्रकारे राज्यात तीन पक्षांचं एक झाड आहे. त्या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री (CM Thackeray) आहेत. ते खोडावर नाहीयेत. ते जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरुन जाणार, अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी वर्तवली आहे.

संजय राऊतांचं राणेंना उत्तर

गेली ५० वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची शिवसेनेची क्षमता महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंना उत्तर दिलं.