शिवसेना नेत्याने उभारले मुंडे साहेबांचे स्मारक, पाहताच पंकजा मुंडे म्हणाल्या….

नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजपासून तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. शहरात येण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी नांदुर शिंगोटे येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या भव्य दिव्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म हे माझं भाग्यच आहे अशा शब्दांत ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून नांदूरशिंगोटे येथे आकर्षक स्मारक उभे राहिले असून येथे १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. राज्य सरकार पर्यटन विभाग व जिल्हा परिषदेच्या निधीतून हे स्मारक उभे राहिले आहे. नांदूरशिंगोटे गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी रेणुकामातेचे जागृत देवस्थान याबरोबरच लोकनेते मुंडे साहेबांचे स्मारक साकारण्यात आल्याने येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंकजा मुंडे यांनी स्मारकास भेट देऊन पाहणी केली. शहरात आगमन होताच त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने वाजत-गाजत जल्लोषात स्वागत झाले.

पाहणीसाठी आल्या अन् सभाच झाली

स्मारकाची केवळ पाहणी करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांची यावेळी बघता बघता सभाच झाली, एवढी गर्दी येथे झाली होती. यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला, त्या म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या पोटी जन्म हे माझं भाग्यच आहे. साहेबांचं जाणं आपल्या सर्वांसाठी वेदनादायक होतं, त्यांचेसाठी माझं एखादं अवयवही दान केलं असतं पण ती वेळ नियतीनं येऊच दिली नाही. सर्व जाती धर्मात त्यांना मानणारे लोक होते. त्यांचेवरील तुमच्या प्रेमाच्या नात्यापुढे सर्व फिक पडलं. वंचितांचं भलं करण्याचा विडा त्यांनी उचलला होता, त्याचं हेच काम आपण पुढे नेणार आहोत. माझेवर टिका करणारांना हेच सांगायचं माझं नेतृत्व हे नाटक नाही समर्पण आहे, जो खरं समर्पण करतो तो लोकनेता होतो..साहेबांची हिच शिकवण होती. तुमची आणि माझी नाळ जोडलेली आहे असे सांगून दस-याला भगवान भक्तीगडावर आपण व्यसनमुक्तीचा जो संकल्प तरूणांना दिला आहे, तो अंमलात आणावा आणि हिच माझेसाठी भाऊबीज असेल असे त्या म्हणाल्या.

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, नामको बॅकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे, सरपंच गोपाळ शेळके, पंचायत समिती सदस्य शोभा बर्के उपस्थित होते.