विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या

नाशिक : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे, अशा प्रतिक्रिया बैलगाडा प्रेमींमधून उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी तसेच शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बैलगाडा शर्यतींसाठी न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे. तसेच या बैलगाडा शर्यतीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे देखील दिसून आले आहे.