राज्यातील सत्ता संघर्षात थेट केंद्राची एन्ट्री;  बंडखोर आमदारांच्या बाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय 

 मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे.

दरम्यान, आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव  आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता बाकीचे आमदार कोण आहेत याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे.