शिवसेना खासदार भावना गवळींच्या अडचणी वाढल्या, ईडीनं केले आरोपपत्र दाखल

 मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणी वाढत आहेत.परिवहन मंत्री अनिल परब, आ. प्रताप सरनाईक,अर्जुन खोतकर,मिलिंद नार्वेकर या  नेत्यांवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. एकाबाजूला हे सर्व सुरु असताना आता दुसऱ्या बाजूला खासदार भावना गवळी यांच्या देखील अडचणी वाढताना दिसून येत आहेत.

खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट प्रकरणी ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत.

ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं हे विचारपूर्वक रचलेलं षडयंत्र होतं. ट्रस्टमधून पैशांचा फेरफार करण्यासाठी हे करण्यात आलं होतं. जप्त करण्यात आलेली प्रॅापर्टी ट्रस्टमधून फेरफार करण्यात आलेल्या पैशातून विकत घेण्यात आली होती. ईडीने 11 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधित लोकांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी भावना गवळी यांना तीन समन्स बजावण्यात आलीत. पण त्या चौकशीसाठी अद्याप हजर झालेल्या नाहीत.