पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेला आठवलेंचा तडाखा; मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

कोलकाता – कोलकाता येथे रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेच्या कार्यकर्ता संमेलन मध्ये आज पश्चिम बंगाल शिवसेनेचे आयुष हलदर (Aayush Haldar) आणि सलील चंद्र महातो (Saleel Chandra Mahato)यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसेना कार्यकर्त्यानी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle)यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. कोलकाता येथील भारत सभा हॉल येथे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना. रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी आरपीआय चे पश्चिम बंगालचे अध्यक्ष मृत्युंजय मलिक; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्याने येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेनेला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याचे या कार्यकर्त्यानी यावेळी जाहीर केले. पश्चिम बंगाल मध्ये दलितांची देशात सर्वाधिक म्हणजे 35 टक्के लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल च्या 21 जिल्ह्यांत रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे.संपूर्ण पश्चिम बंगाल मध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार. रिपब्लिकन पक्ष पश्चिम बंगाल च्या गावागावात पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असे रामदास आठवले म्हणाले.

पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना पूर्ण बहुमत लाभले आहे. त्यामुळे सरकार म्हणून त्यांनी सर्व जनतेच्या जीवाचे रक्षण केले पाहिजे. कोणताही भेदभाव न करता सर्व जनतेचे रक्षण करणे हे मुख्यमंत्री म्हणून ममता दिदींचे कर्तव्य आहे.मात्र पश्चिम बंगाल मध्ये सध्या मोठया प्रमाणात हल्ल्याच्या घटना घडत आहेत.हिंसाचार वाढत आहे.हल्ले रोखण्याचे काम करीत राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे अग्रक्रमाने काम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास जिंकत काम करीत आहेत.पंतप्रधान म्हणून कोणताही भेदभाव ते करीत नाहीत. अनेक योजना गावागावा पर्यंत राबवीण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झालेत. शांतता ठेवल्याने विकास होतो.पश्चिम बंगाल मध्ये शांतता ठेवून राज्याचा विकास साधावा असे आवाहन रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आहे.