सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत धुसफूस; जिल्हाप्रमुखावर उपजिल्हाप्रमुखाचे गंभीर आरोप

करमाळा – राज्य शासनाने जाहीर केलेल्या करमाळा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) समितीमध्ये एकाही शिवसैनिकाला संधी मिळाली नाही हे धनंजय डिकोळे (Dhananjay Dikole) यांचे अपयश असून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचा वापर करणाऱ्या धनंजय डिकोळे यांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आली

या बैठकीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे (Shiv Sena Deputy District Chief Mahesh Chiwte), युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड (Vishal Gaikwad), महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड (Priyanka Gaikwad), शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शीलवंत, माजी उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर अमोल घाडगे, युवा सेने उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, उप शहर प्रमुख सागर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी दोन वर्षात एकदाही करमाळा दौरा केला नाही. शिव संपर्क मोहिमेची सभासद नोंदणी फॉर्म सुद्धा पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दिले नाहीत. केवळ कुर्डूवाडी नगरपालिका व स्वतःचा विकास डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्यामुळे करमाळा तालुका शिवसेना संघटना खिळखिळी झाली आहे असा आरोप करण्यात आला.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करून खोटे अहवाल द्यायचे व वेळ मारून न्यायची यात तरबेज असलेल्या यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन्ही तालुक्यात शिवसेना नावापुरती राहिली आहे. टेंभुर्णी येथील शिवसेनेचे नेते संजय कोकाटे हे आपल्या पुढे जातील हे ओळखून त्यांना पद्धतशीर साईडला करून ठराविक वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून असलेल्या पदाधिकाऱ्यांना खालच्या पदावर ठेवून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवत आहेत असा देखील आरोप यावेळी करण्यात आला.

कुर्डूवाडी शहरातून नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 8 ते 9 हजार मते मिळतात मात्र विधानसभेच्या निवडणुकीला कुर्डूवाडी शहरातून शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ दोन हजार मते मिळतात हा गेल्या तीन पंचवार्षिक चा इतिहास आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या करमाळा तालुक्याच्या कमिटीमध्ये एकाही शिवसैनिकाला संधी मिळाली नाही हे पक्षाचे दुर्दैव असून याला सर्वस्वी जबाबदार धनंजय डिकोळे आहेत असा आरोप या बैठकीत शिवसैनिकांनी केला.

याबाबत बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, तालुकास्तरीय सर्व कमिटीवर शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी मी धनंजय तिकडे यांच्याकडे करून त्यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सदस्यांची यादी दिली होती. 20 टक्के प्रतिनिधित्व शिवसेनेला देण्याचे निश्चित झाले होते पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे डिकोळे यांनी पाठपुरावा केला नाही. आज प्रसिद्ध झालेल्या यादीत एकाही शिवसैनिकाला संधी मिळाली नाही याबाबत मी सविस्तर शिवसेना नेते अनिल देसाई (Shiv Sena leader Anil Desai) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असून शिवसैनिकांच्या भावना त्यांच्यापुढे मांडल्या आहेत