शिवसेनेला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी पेक्षा आगामी काळात वाईट दिवस येणार आहेत – महाजन

जळगाव : महाविकास आघाडीतील पक्षांनी (MVA) आमच्यावर कितीही टिका केली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यांची जनमाणसातील प्रतिमा घसरली आहे. शिवसेनेला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी पेक्षा आगामी काळात वाईट दिवस येणार आहेत, अशी टिका भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली.

शिवसेनेने ‘शॉर्टटर्म’चा विचार करून राज्यात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळविली आहे. मात्र त्यांनी ‘लॉंग टर्म’चा विचार केलेला नाही. त्यांची जनमाणसातील प्रतिमा घसरली आहे, येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षाही शिवसेनेची परिस्थिती अत्यंत वाईट होईल.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला. महाजन म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत, दररोज सकाळी हा भोंगा वाजतो त्यांच्याकडे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता याचे कोणतेही प्रश्‍न नसतात.त्यांच्याकडे किरीट सोमय्या, राणा कुंटूब आणि ईडी हेच विषय असतात.