शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती, उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.

आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू , अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.