पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ( Shiv Sena UBT) तयारी सुरू केली असून, 2017 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या नेत्यांची सद्यस्थिती तपासण्याचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आला आहे. शिवसेनेच्या गटाला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर, पक्षात कोण-कोण राहिले आहेत आणि कोण बाहेर पडले आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे.
2017 मध्ये शिवसेनेने( Shiv Sena UBT) पुणे महापालिकेच्या 138 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवली होती आणि 8.23 लाख मते घेतली होती, जे सुमारे 14% मतदान होते. मात्र, सध्या पक्षातील अनेक नेते आणि माजी नगरसेवक भाजपामध्ये गेल्याने पक्षात असलेल्या नेत्यांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असल्यास 60 ते 65 जागा मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
यासंदर्भात नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि विधानपरिषद आमदार सचिन आहिर यांची भेट घेतली. या बैठकीत शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक वसंत मोरे, संजय भोसले, पृथ्वीराज सुतार, आणि कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी नेत्यांनी सांगितले की, शिवसेनेची शहरातील पूर्वीची ताकद आणि 2017 च्या निवडणुकीत मिळवलेले मताधिक्य लक्षात घेता, पक्ष महापालिकेतील 138 जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्यास सक्षम आहे. मात्र, जर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असेल, तर 60-65 जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशीही सूचना करण्यात आली आहे.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात पुण्यात येणार असून, या चर्चेत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule