महावितरणच्या कारभारावर नाराजी दर्शवत शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला ‘हा’ इशारा

करमाळा – शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. करमाळा मतदारसंघात सध्या वीज बिल वसूलीच्या नावाखाली शेतीपंपाचा वीज पुरवठा केवळ दोन तासच करण्यात आला आहे.याबाबत आज मा. आ. पाटील यांनी आवाज उठवला असुन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने महावितरणच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माजी आमदार पाटील यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की करमाळा मतदार संघात सध्या शेतकऱ्याला वेठीस धरले जात असुन महावितरणकडून लीज बिल वसुलीसाठी शेतीपंपाची वीज आठ तासावरुन दोन तास इतकी करण्यात आली आहे. हि कृत्रीम वीज टंचाई असुन या दोन तास वीजपुरवठ्यात शेतकऱ्याला गुरांचा चारा-पाणी, रोजच्या उदरनिर्वाहासाठी लावलेल्या तरकारी म्हणजेच भाजीपाला व रानात भोठ्या आशेने पेरलेली तुर, सोयाबीन, गहू, ज्वारी आणि अन्य पिके यांना पाणी पुरवठा करयचा आहे. जे शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणुन कुकुटपालन व्यावसाय करत आहेत त्याच्यावरही याचा दुष्परिणाम होत असून विकत घेतलेली नवजात पिले प्रकाश अथवा ठराविक उष्णता नसल्याने जीव सोडत आहेत.

घास, कडवळ,मकवान या सारख्या पशुखाद्याच्या पिक उत्पादनावर याचा परिणाम होत असुन चाराटंचाई निर्माण होईल अशी स्थिती आहे. बहुतांश दुग्ध व्यावसायिक शेतकरी कडबा वा पशुखाद्य कुट्टीसाठी वीजेवर चालणारी अवजारे, उपकरणे वापरत असल्याने त्यांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शेतीपंपासह अनेक ठिकाणी सिंगल फेज वीज पुरवठा सुद्धा कपात केल्याने शेतकऱ्याचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले असून तासन तास वीजेकडे शेतकऱ्याला डोळे लावून बसावे लागत आहे. हि सर्व परिस्थिती शेतकऱ्याला वेठीस धरणारी अशीच आहे.

दोन तास वीजपुरवठा हा शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय असून त्याला भविष्यातही आर्थिक खाईत ढकलणारा असाच आहे. एकीकडे अविरत पावसाने अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाया गेल्याने त्या पिकांची नुकसानभरपाई मिळेल या आशेवर शेतकरी दिवस काढत असताना महावितरण कडून मात्र हि वसुली मोहिम चालू असणे म्हणजे सरकारच्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या चांगल्या धोरणावर पाणी फेरण्यासारखे आहे. शेतकर्‍यांच्या हाती शेतमालाच्या विक्रीचा पैसा आल्यानंतर वीज बिल भरण्याइतपत इमानदारी शेतकरी अवश्य दाखवेल परंतू आता दोन तास वीजपुरवठा करुन शेतकऱ्याला कोंडीत पकडणे हा अन्याय आहे.

महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असल्याचे आपण ह्या प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यावरील अन्याय दुर करावा म्हणून साकडे घातले आहेच.परंतु विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठीमागे करमाळा तालुक्यातील शेतीपंपासाठी केवळ दोनच तास वीजपुरवठा करा अशी लेखी पत्राद्वारे महावितरणकडे मागणी केल्यानेच आज महावितरण शेतकऱ्यांबाबत एवढे कठोर वागत आहे.

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांवर जेंव्हा जेंव्हा वीज व पाणी याबाबत अन्याय झाला तेव्हा आपण शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिलो असुन आमदार पदावर असतानाही रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी झालो होतो. यामुळेच आज जर वेळीच महावितरणकडून दोन तास वीजेचा निर्णय रद्द होऊन पूर्वीप्रमाणे शेतीपंपासाठी आठ तास वीजपुरवठा देण्याची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण आपल्या रास्तारोकोच्या भुमिकेवर ठाम असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.या निवेदनाच्या प्रति ऊर्जामंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी भिलींद शंभरकर, अधिक्षक अभियंता सोलापूर, तहसिलदार करमाळा यांना पाठवल्या आहेत.

हे ही पहा: