धक्कादायक : आठवीतल्या मुलांनी केला सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी कथितपणे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  ही घटना सोमवारी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वर्गातील इतर मुले डान्स प्रॅक्टिससाठी बाहेर गेले त्यावेळी दोन विद्यार्थ्यांनी या पीडित मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी आणि आरोपी हे सर्वजण आठवीचे विद्यार्थी आहेत.या घटनेने पीडित मुलीला मोठा धक्का बसला आहे. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मुलांच्या विरोधात आयपीसी 376 डीए आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि त्यामुळे त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.