धक्कादायक : माजी मंत्री दिलीप सोपलांच्या बंगल्यावर फटाके फेकले

सोलापूर-महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटवर, गेटच्या आतमध्ये भर दिवाळीत पाच जणांनी दूरपर्यंत आवाज जाणारी फटाके फोडले. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दूरपर्यंत आवाज जाणारे  फटाके जाणूनबुजून फोडण्यात आले असल्याची तक्रार दाखल केली आहे.सोपल यांनी २३ ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. ३ नोव्हेंबर रोजी सोपल स्वतः बार्शी पोलीस पोलिस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली आहे. पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार (सर्व रा. बार्शी, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या फटक्यांमुळे बंगल्यातील गवत जळाले आहे.

ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.पोलिसांनी पंचनामा केला असून संगनमत करुन शांतता भंग केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार्शी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट याबाबत अधिक तपास करीत आहेत.