मुंबई – 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये परतलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा कोविड-19 चा नवा प्रकार आढळल्याचं त्याच्या प्रयोगशाळा अहवलातून सिद्ध झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हा तरुण रहिवासी असून त्याचं लसीकरण अद्याप झालेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याची लक्षणं सौम्य स्वरूपाची असून तो सध्या कल्याण डोंबिवली इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 अति जोखमीच्या आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून या सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
याशिवाय या तरूणानं दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानानं केला त्या प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध अद्याप सुरू आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेहून गुजरातमधल्या जामनगर इथं परतलेल्या व्यक्तिमध्ये देखील ओमिक्रॉन हा प्रकार आढळला असून या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव मनोज अगरवाल यांनी दिली.