द्विशतक शुबमन गिलचं पण चर्चा सचिन तेंडूलकरच्या लेकीचीच, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

हैदराबाद- भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात धुव्वादार फटकेबाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढत वनडेतील तिसरे शतक झळकावले. पुढे शतकी खेळीला त्याने द्विशतकात (Shubman Gill Double Century) रुपांतरित केले. ४९व्या षटकात सलग ३ षटकार मारत शानदार स्टाईलमध्ये त्याने द्विशतकाला गवसणी घातली. तो वनडेत द्विशतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज आहे.

शुबमन गिलच्या द्विशतकी खेळीनंतर सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar Daughter) याची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) ही चर्चेत आली आहे. तिचे मीम्स व्हायरल करत युझर्स साराचे नाव शुबमनसोबत जोडत आहे. शुबमनच्या वनडेतील द्विशतकावर सचिन प्रभावित झाला असून त्याने सारासोबत त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली असल्याची खोटी बातमीही काही सोशल मीडिया वापरकर्ते पसरवताना दिसत आहे. सारा तेंडूलकरबरोबरच सारा अली खानच्या नावाचीही चर्चा आहे.

https://twitter.com/troller_Adi28/status/1615683784015503363?s=20&t=UdJRmGStJSHeG3lSmECcPQ

दरम्यान गिल १४९ चेंडूंचा सामना करताना ९ षटकार आणि १९ चौकारांसह २०८ धावांवर बाद झाला. यासह शुबमन वनडेत द्विशतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज बनला आहे. २३ वर्षे आणि १३२ दिवसांचे वय असताना शुबमनने द्विशतक झळकावले आहे. या विक्रमात त्याने इशान किशन आणि रोहित शर्मा यांना मागे सोडले आहे. तसेच तो न्यूझीलंडविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाराही पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने सचिन तेंडूलकरला मागे सोडले आहे.