भ्रष्टाचार करणाऱ्यांची आता खैर नाही; केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढण्याची चिन्हे

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि परिवारवादावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून निशाणा साधला.

देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे.आज आपल्याला दोन मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही, भाऊ- भाच्याचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले की, देशातील अनेक संस्थांवर कुटुंबवादाची छाया आहे. आपल्या अनेक संस्थांवर कौटुंबिक राजवटीचा परिणाम होतो, त्यामुळे आपली प्रतिभा आणि राष्ट्राची क्षमता नष्ट होते आणि भ्रष्टाचाराला जन्म दिला जातो. कुटुंबवादाच्या विरोधात लढा निर्णायक वळणावर नेणे ही आपली घटनात्मक आणि लोकशाही जबाबदारी आहे. असं ते म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विरोधकांवर शरसंधान केलं. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं असून, त्याचा अर्थ केंद्रीय यंत्रणाच्या कारवाया वाढणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.