‘देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी महाराष्ट्राचे बजेट मांडले तेव्हापासून मोठ्या संख्येने भाजपात पक्ष प्रवेश होत आहेत’

शिंदे-फडणवीस सरकारने दिला ओबीसींना न्याय!

रिसोड – उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सरकार बनवून ओबीसींचे आरक्षण घालविण्याचे काम केले. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर ओबीसींना संवैधानिक आरक्षण मिळवून दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसींना न्याय मिळाला आहे. या शब्दात शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, सरकार गेल्यावर आता उद्धव ठाकरे वज्रमूठ बांधून सभा करीत आहेत. मात्र त्यांच्या मुठा सैल पडल्या आहेत.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपा संकल्प मेळाव्यात बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २५ हजार कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजपा सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटनी, आ. लखन मलिक, आ. तानाजी मेटकुळे, आ. वंसत खंडेलवाल, आ. हरीश पिंपळे, आ. निलय नाईक, रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, माजी मंत्री संजय कुटे, माजी मंत्री रणजित पाटील, नकुल देशमुख, चैतन्य देशमुख, अनूप धोत्रे, राजू पाटील राजे, कृष्णाआप्पा आसनकर, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

• पक्षात प्रवेशासाठी रांगा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी महाराष्ट्राचे बजेट मांडले तेव्हापासून मोठ्या संख्येने भाजपात पक्ष प्रवेश होत आहेत. झुंबड लागली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शिल्लक असणारे अनेक पक्ष प्रवेशासाठी रांगा लावून आहेत. त्यांनाही महाराष्ट्रात विकासाचे परिवर्तन घडवायचे आहे.
– चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश अध्यक्ष, भाजपा

• आमची वज्रमूठ विकासाची – फडणवीस
महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा फोटो मी पाहिला, त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही. आमची वज्रमूठ ही विकासाची आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक नाकर्ते सरकार आपल्याला अडीच वर्ष पहायला मिळाले. लाडली लेक योजनेच्या माध्यमातून कन्येचा सन्मान करण्यात येणार आहे. घरी जन्माला येणारी मुलगी ही जन्मत:च लखपती राहणार आहे. शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. शेतकरी जे जागा किरायाने देतील, त्यांना एकरी ५० हजार रुपये आणि वार्षिक तीन टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

• कॉंग्रेसमध्ये न्याय मिळाला नाही – देशमुख
मेळाव्याच्या माध्यमातून जमलेल्या जनतेपुढे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, कॉंग्रेसमध्ये ४० वर्षे काम केले पण अंतर्गत राजकारणात अडकलेल्याने न्याय मिळाल नाही. माझ्या विरोधात एका माजी मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला. मालेगाव-रिसोड मतदारसंघातील जनतेला विचारूनच भाजपात प्रवेश केला असल्याचा दावा यावेळी देशमुख यांनी केला. या भागाच्या विकास करण्याचे काम केवळ भाजपाच करू शकते असा दावाही त्यांनी केला.