Prakash Javadekar | छोटे व्यापारी हे देशाचा आर्थिक कणा, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे वक्तव्य

Prakash Javadekar | बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्त्वकांक्षा आणि जगण्याच्या पद्धती बदलत आहे, त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाइन शॉपिंग वाढीला लागणे हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत, हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी व्यक्त केले.

स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला. असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, अध्यक्ष सचिन जोशी, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडित, किशोर चांडक, मोहन साखरिया आदी उपस्थित होते.

असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी.आर.गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पेश टेÑडर्सचे राजेश शहा व कल्पेश शहा, फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकीता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात आला. कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील रहिवासी गीता ओक यांना देण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, व्यापारी छोटा असला तरी त्याचा जर ब्रँड निर्माण झाला तर तो जागतिक पातळीवर व्यवसाय करू शकतो, हे मॅकडोनाल्ड सारख्या व्यवसायाने दाखवून दिले आहे. त्यावरच वाटचाल करत कोहिनूर ग्रुपने आपली वाटचाल जागतिक स्तरावर नेली आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल संस्कृतीमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अनेक मोठे संकटे निर्माण झाले आहे. परंतु त्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यवसाय करण्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजे. काळानुसार व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत आहेत त्याचप्रमाणे बदल घडवून जर व्यवसाय केला तर व्यवसाय निश्चितच टिकू शकत आणि आपला व्यापार हा केवळ एक छोटा व्यापार राहणार नाही तर त्याला राष्ट्रीय आणि जागतिक दर्जा मिळू शकेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like