अहमदनगर शहरातील नगरसेवक जर शिंदे गटात गेले तर त्यांना ही काळे फासू; स्मिता अष्टेकर यांचा इशारा

नगर – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे.

दरम्यान, नगरमधून सुद्धा काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला नेत्या तथा माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शिंदे गटात सहभागी झाल्यास शिवसेना नगरसेवकांना काळे फासण्याची धमकीच त्यांनी आज दिली आहे.

स्मिता अष्टेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर शहरातील नगरसेवक फोडण्याचे थांबवावे अन्यथा त्यांना काळे फासले जाईल. अहमदनगर शहरातील नगरसेवक जर शिंदे गटात गेले तर त्यांना ही काळे फासले जाईल. माझे प्रकरण विसरू नका मी काय कांड केले हे तुम्हाला माहीत आहे, असा इशारा स्मिता अष्टेकर यांनी दिला.