…म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारचे धनंजय मुंडेंनी मानले आभार…

मुंबई – माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाने १३५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरादरम्यान केली आहे.

आमदार धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर मागील काही वर्षांपूर्वी भाजपचे सरकार सत्तेत असताना छत्रपती संभाजीनगर येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाची केलेली घोषणा अपूर्ण असल्यावरून देखील धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

अर्थसंकल्पीय चर्चेअंती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोन्ही प्रश्नांचे निराकरण केले. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला १३५ कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला असून, प्रचलित नियमानुसार त्याच प्रमाणात कल्याण निधी संकलित केल्यास महामंडळाला एकूण २७० कोटी रुपये निधी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्या परवानग्या पूर्ण होताच स्मारक उभारणीचे काम सुरू केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील ८ महिन्यापासून ठप्प असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी देण्याच्या घोषणेचे धनंजय मुंडे यांनी स्वागत करत देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानले आहेत, त्याचबरोबर महामंडळ व स्मारकाच्या कामाला आता गती मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.