‘तुम्ही वसुली गँग काढलीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांना डीटेक्टिव एजन्सी काढावी लागली’

मुंबई   – काल सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केले.  सरकारने गृहविभागासाठी घेतलेले चांगले निर्णय सांगतानाच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा केलेला गैरवापर, अवैध फोन टॅपिंग, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेली गैरकारवाई यासह देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह सभागृहात दाखल केला त्यावर भाष्य करत सत्य बाहेर काढण्याचे व सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

आपण मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना ३३ हजार विहीरांचा जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी आपण आणखी एक पेनड्राईव्ह दिला आणि आजही एक पेन ड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना करताच सभागृहात एकच हशा पिकला.

आपण जो पेनड्राईव्ह दिलेला आहे, त्याचा तपास राज्यशासन करणार आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे, तो सरकारने स्वीकारला आहे हे सांगतानाच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर करत त्या चौकशीतून वस्तूस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, डिटेक्टिव्ह एजन्सीबाबत फडणवीस यांना जोगृहमंत्र्यांनी टोला लगावला त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजेंसी काढली का ? इति गृहमंत्री. तुम्ही वसुली गँग काढलीत म्हणून देवेंद्रजींना डीटेक्टिव एजन्सी काढावी लागली.असा जबरदस्त टोला त्यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.