…म्हणून गिरीश महाजन यांना करोनाची लागण; खडसेंच्या दाव्याने खळबळ 

जळगाव : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील विजय पाटील (Adv.Vijay Patil) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे.

दरम्यान, एकाबाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. यावरून आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे.खडसे म्हणाले, ‘ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा करोना झाला, अशी प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र त्यावेळी मला खरंच करोना झाला होता. आताही गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत आहे आणि त्या भीतीतूनच त्यांना करोना झाल्याचा संशय आहे. तरीही माझी प्रार्थना आहे की, गिरीश महाजन लवकर बरे व्हावेत, त्यांची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी मी प्रार्थना करणार आहे,’ असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच, असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांना मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करायची होती मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले.