… तर आदिनाथ साखर कारखान्याच्या शेअरची किंमत झिरो होणार ?

करमाळा – आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवीस वर्षे दीर्घ मुदतीच्या कराराने आमदार रोहित दादा पवार यांच्या ताब्यात गेला तर आदिनाथ 30 हजार सभासदांच्या प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या शेअरची किंमत झिरो होणार आहे. यामुळे सभासदांनी जागृत होऊन आमदार रोहित दादा यांना विरोध केला पाहिजे असे स्पष्ट मत आदिनाथ बचाव समिती सदस्य  पांडुरंग देशपांडे यांनी केले आहे. मात्र आमदार रोहित पवार यांनी सहकार तत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला तर माझा त्यांना पाठिंबा राहील असे एडवोकेट तथा बचाव समितीचे सदस्य देशपांडे यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना एडवोकेट देशपांडे म्हणाले की माझ्या घरात तीन शेअर्स असून तीस हजार रुपयांची आदिनाथ मध्ये गुंतवणूक आहे या गुंतवणुकीला तीस वर्ष उलटून गेले आहेत. तीस वर्षांपूर्वी मी 18 हजार रुपयाला एक गुंठा जागा घेतली होती. त्याची किंमत आता 40 लाख रुपये झाली आहे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात गुंतवलेल्या तीस हजार रुपयाची किंमत आता झिरो रुपये होणार आहे. राज्य शासनाचा पंधरा वर्षे मुदतीचा करार असताना स्वतःच्या स्वार्थासाठी कायदा बदलून 25 वर्षाचा करार करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांचे सुरू आहे.

शिवाय कारखान्याची 250 एकर जमीन असून जवळपास 250 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विद्यमान संचालक मंडळाला हाताशी धरून करमाळा तालुक्याच्या जनतेच्या सभासदांच्या पाठीत खंजीर खुपसणे चा कार्यक्रम आहे. विद्यमान संचालक मंडळ व तालुक्यातले आजी-माजी पदाधिकारी आमदार याबाबत काहीच बोलत नाही हे सुद्धा दुर्दैव आहे.

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार सहकाराचे प्रणेते असून आता या प्रकरणात सुद्धा पवार साहेबांनी हस्तक्षेप करून आदिनाथ कारखाना सहकार तत्त्वावर सुरू करण्यासाठी मदत करावी व साखर उद्योगात वाढणारी खाजगी प्रवृत्ती बाजूला करावी अशी मागणी एडवोकेट देशपांडे यांनी केली आहे.

राज्य सहकारी बँकेने चुकीच्या पद्धतीने जप्तीची कारवाई केली शिवाय बारामती ऍग्रो जाणीपूर्वक स्वतःच्या कारखान्याला करमाळा तालुक्यातील पाच लाख मेट्रिक टन ऊस स्वस्त दरात मिळावा म्हणून करार करण्यात चालढकल केली यामुळे आदिनाथ कारखान्याची सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले ऊस उत्पादकांवर ऊस पेटवून देण्याची वेळ आली याबाबतही आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे एडवोकेट देशपांडे यांनी सांगितले.