मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या राजन पाटलांनी भाजपमध्ये यावे- प्रमोद सावंत

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते राजन पाटील (Rajan Patil) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना एक प्रश्न आवर्जून विचारला की, हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, आपण भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री आहात. मग आपण यांच्या निवासस्थानी आपुलकीने आवर्जून भेटीला येण्याचं कारण काय?

यावेळी अत्यंत नम्रपणे, शांतपणे एकच उत्तर त्यांनी दिले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे,” हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी युवा नेते बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेले.