एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, शक्य तरी आहे का?

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी बृजभूषण सिंह यांचा समाचार घेताना ते म्हणाले, आत्ता जाग आली? राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे? १२-१४ वर्षांनी आठवण आली का? तेव्हा ही माणसं कुठे होती? यातून चुकीचे पायंडे पडतायत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणे राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय पाय ठेऊ देणार नाही. विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना मारलं, एका रात्रीत १०-१५ हजार बिहारी, उत्तर प्रदेशवाल्यांना हाकलून लावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे?

एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही. असं ते म्हणाले.