सोनू निगमच्या वडिलांच्या घरी तब्बल ७२ लाखांची चोरी, सीसीटीव्हीत समोर आला दरोडेखोराचा चेहरा

Mumbai- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याचे वडील (Sonu Nigam father) आगम कुमार निगम (Agam Kumar Nigam) यांच्या घरी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या घरातून ७२ लाख रुपये लुटण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आगम कुमार यांच्या माजी चालकावर आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे. सोनूची बहीण निकिता हिने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, गायक सोनू निगमच्या 76 वर्षीय वडिलांच्या माजी ड्रायव्हरवर घरातून 72 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकाचे वडील आगम कुमार निगम हे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथील विंडसर ग्रँड बिल्डिंगमध्ये राहतात आणि कथित चोरी 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान घडली, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी चालकाला कामावरून काढून टाकण्यात आले होते
सोनू निगमची धाकटी बहीण निकिता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आगम कुमार निगमकडे रेहान नावाचा ड्रायव्हर सुमारे 8 महिने होता, परंतु त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. या कारणास्तव त्याला नुकतेच कामावरून काढून टाकण्यात आले होते.

वॉर्डरोबमध्ये बनवलेल्या लॉकरमधून 40 लाख गायब 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगम कुमार निगम रविवारी वर्सोवा भागात निकिताच्या घरी जेवायला गेले आणि काही वेळाने परतले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या मुलीला फोनवरून सांगितले की, लाकडी अलमिरामध्ये ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गायब आहेत.

सीसीटीव्ही फुटेज समोर आले
दुसर्‍या दिवशी आगम कुमार निगम व्हिसा संबंधित काही कामासाठी 7 बंगला येथे मुलाच्या घरी गेले आणि संध्याकाळी परत आले. लॉकरमधून 32 लाख रुपये गायब असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आणि लॉकरचेही नुकसान झाले नाही. यानंतर आगम कुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये माजी ड्रायव्हर रेहान दोन्ही दिवशी बॅग घेऊन फ्लॅटकडे जाताना दिसतो. तक्रारीनुसार, आगम कुमारला संशय आहे की रेहानने डुप्लिकेट चावीच्या मदतीने आगम कुमार यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरले.

निकिताच्या तक्रारीवरून, ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत चोरी आणि घरात घुसखोरी केल्याबद्दल एफआयआर नोंदविला, अधिका-याने सांगितले की, तपास सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.