पंजाबच्या राजकीय लढाईत उतरण्यासाठी सोनू सूद तयार; ‘या’ पक्षात करू शकतो प्रवेश 

चंडीगड – रुपेरी पडद्यावर अभिनयाची छाप सोडलेला लोकप्रिय अभिनेता सोनू सूद आता राजकारणात उडी घेण्याच्या तयारीत आहे. कोरोना महामारीच्या काळात असहाय आणि गरिबांना मदत केल्याबद्दल सोनू सूदचे खूप कौतुक झाले. कोरोनाच्या संपूर्ण काळात त्यांनी लोकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये त्यांनी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी नेण्याचे चांगले काम केले होते.आता येत्या 10 दिवसात सोनू सूद राजकारणात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

5 जानेवारीला पंजाबमधील फिरोजपूर येथे होणाऱ्या पीएम मोदींच्या रॅलीत सोनू सूद येणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही, त्या केवळ अफवा आहेत. सोनू सूद 4 जानेवारी रोजी गरजू मुली आणि आशा वर्कर्सना 1000 सायकलींचे वाटप करणार आहेत.

सोनू सूदचा राजकीय प्रवास पंजाबमधून सुरू होऊ शकतो

अनेक दिवसांपासून अभिनेता सोनू सूदच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आता तो राजकीय आखाड्यात उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे असे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे सोनू सूदची बहीण मालविकाने यापूर्वीच पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

सूद यांनी चन्नी यांची भेट घेतली

गेल्या महिन्यातही सोनू सूदने चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन बहीण मालविका निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यादरम्यान सोनू सूदने पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यतांनी काही दिवस जोर धरला आहे.