राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी, मुंबई – यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांचा २६ नोव्हेंबर या संविधान दिनी वाढदिवस. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान या दिवशी देशाप्रती अर्पण केले. त्या संविधानाने अनेक वंचित, उपेक्षित, सामान्यजन यांना विविध क्षेत्रात संधी मिळल्या. त्यातीलच डॉ. बबन जोगदंड, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिक्षण” या संदेशंचे तंतोतंत पालन करुन तब्बल १५ विषयात पदव्या व १० विषयात डिप्लोमा प्रमाणपत्र मिळविले. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख –
माणूस हा समाजशील प्राणी असून तो एका सामाजिक व्यवस्थेमध्ये आपले संपूर्ण जीवन व्यतीत करतो. समाजात आणि समुदायात वावरत असताना आपला अनेक व्यक्तींशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सबंध येत असतो. मात्र यातील काही व्यक्तींशी आपली ओळख आणि परिचय होतो आणि त्यातील अगदी थोड्या व्यक्तींसोबत आपले ऋनानुबंध तयार होतात. ऋनानुबंध जुळतात म्हणजे काय? तर विचार जुळतात आणि संबंध वृद्धिंगत होतात. शेवटी कोणतेही संबंध हे एका बाजूकडून पुढे जात नाहीत तर त्यासाठी दोन्ही बाजू कडून योगदान आणि समर्पण लागते.
माझ्या आयुष्यात ज्या काही व्यक्तींशी प्रेमाचे आणि मित्रत्वाचे ऋनानुबंध जोडले गेले त्यापैकी एक नाव म्हणजे माझे मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार डॉ. बबनराव जोगदंड सर होत. असे कोणतेही असे क्षेत्र नाही की, जेथे जेथे सरांनी पाऊल ठेवलं नाही आणि ज्या क्षेत्रातील व्यक्ती त्यांचा मित्र नाही. अशा या आमच्या आणि तुमच्या आणि आपल्या सर्वांचा मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार बबनराव जोगदंड सर यांच्या व्यक्तिमत्वाबाबत जाणून घेण्याचा आणि त्यांचे व्यक्तिमत्वाचे विविधांगी पदर उलगडून दाखवण्याचा मी एक लहानसा प्रयत्न करणार आहे.
जोगदंड सरांची आणि माझी ओळख कधी आणि केव्हा झाली हे मी माझ्या मेंदूवर कितीही ताण देवून आठवायचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. मला वाटते काही ओळखी ह्या अलगत उमलतात आणि नकळत फुलतात आणि त्या ओळखीतून मित्रत्वाची सुंगधी फुले तयार होतात की, जी प्रेमाचा आनंद चोहीकडे पसरवतात. अगदी तशीच सरांची आणि माझी मैत्री. ओळख हा फक्त सोपस्कार आहे मात्र प्रत्येक ओळख ही चांगल्या संबंधामध्ये बदलणे आणि त्यातून मैत्रीचे नाते निर्माण होणे ही एक प्रक्रिया आहे. जोगदंड सर हे कायम वैयक्तिक पातळीवर, अंतरवैयक्तिक पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर मैत्रीच्या माळा गुंफत असतात. या माळा गुंफत असताना मैत्रीचे धागे ते इतके घट्ट करतात की माणूस त्यांच्या मैत्रीच्या माळेत अलगत गुंफला जातो. त्यानंतर मग मैत्रीचा प्रवास सुरू होतो तो अनंत काळासाठी आणि न थांबण्यासाठी.
जोगदंड सरांची मैत्री म्हणजे फक्त मैत्री राहत नाही तर ती त्याहूनही पुढे जाते. मग सल्ला असो, वैचारिक गप्पा असो, अडचणी असोत आणि मदत असो या बाबत तुम्हाला कोठेही रिक्तपणा जाणवत नाही. प्रत्येकाला नि:स्वार्थीपणाने वेळ देणे आणि शक्य होईल तेवढी मदत करणे हा हातखंडा सरांएवढा कोणाकडेही नसेल. मी नेहमी त्यांना विचारतो की, कसे जमते हे तुम्हाला? तर ते म्हणतात योग्य नियोजन असले, प्रत्येकाला नेमून दिलेल्या वेळेत आपण पोहचलो व आपण त्यांच्यासाठी प्रामाणिक राहिलो की, की सर्व शक्य होते. मला वेळ नाही आणि माझ्याकडे वेळच शिलक नाही. त्यामुळे मला कोणालाच वेळ देताच येत नाही. त्यामुळे माझे मित्र नाहीत. असे बोलणा-यांसाठी जोगदंड सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक मोठी चपराक आहे.वास्तविक सरांच्या भाषेत सांगावयाचे तर वेळ कोणाकडेच नसतो तर वेळ काढायचा असतो, तरच मैत्रीचे नाते गुंफते.
यशदा येथे त्यांच्याकडे असलेले काम, विविध प्रशिक्षण सत्र, यशमंथन या त्रैमासिकाच्या संपादकाची जबाबदारी, याला पूर्ण वेळ देवून सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील कामकाज, विविध मार्गदर्शनपर मुलाखती, निवेदक संघटक म्हणून करत असलेले कामकाज या सर्व कामांची गोळा बेरीज केली तर त्यांच्याकडे एक मिनीट सुद्धा शिल्लक राहणार नाही. मग त्यांना हे सर्व कसे साध्य होते? हा माझ्यासारख्या सर्वांनाच पडणारा एक यक्ष प्रश्न. त्याचे उत्तर मी मागील दोन ते तीन वर्षात जेव्हा शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला विविध बाबी निदर्शनास आल्या.
जोगदंड सरांची ठायी असलेली सकारात्मक ऊर्जा आणि विचार, सतत काम करण्याची प्रवृती, त्यांचे संभाषण कौशल्ये, प्रत्येकाला निरपेक्ष भावनेनं सल्ला आणि मदत करण्याची त्यांची वृती या बाबी कायम उजव्या ठरल्या आहेत. साहजिकच तुम्ही मानवी संबंधाच्यामध्ये येणारे विविध समज आणि गैरसमजचे अडथळे आणि जळमटे दूर केली आणि व्यक्तीसापेक्षता आणि पूर्वग्रहदूषितपणा सोडून दिला की तुमची मानवी संबंध वृद्धिंगत होण्याची गती खूप वाढते हा धडा मी सरांकडून शिकून घेतला. साहजिकच या आणि अनेक बाबी आणि गोष्टी जोगदंड सरांना इतरांपासून वेगळ्या करतात आणि त्यांना एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून पुढे आणतात.
आजच्या या धावपळीच्या युगात दुसऱ्याचे ऐकून घेण्याची आणि त्याला समजून घेण्याची कुवत आणि वृती चोहोबाजुकडे लोप पावताना दिसत आहे. या परिस्थितीत सरांकडे येणारी प्रत्येक व्यक्ती काय सांगतोय हे ते काळजीपूर्वक ऐकतात आणि मग त्या माणसाला योग्य असा सल्ला आणि मदत करतात. असे जेव्हा वारंवार घडते तेव्हा साहजिकच एक आत्मियतेचा धागा निर्माण होतो आणि तो मैत्रिरूपी बंधनात अजून घट्ट होतो.
सरांची शैक्षणिक भरारी इतकी उत्तुंग आहे की त्यांच्या आसपासही कोणी फिरकू शकत नाही. नुसती शैक्षणिक क्षेत्रात त्यांची भरारी नाही तर प्रत्येक विषयाच्या बाबतीत त्यांचा अभ्यास आणि व्यासंग अत्यंत दांडगा आहे. त्यामुळे ते कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलू शकतात लिहू शकतात. त्यांच्या संवादात आणि लेखणीत सुलभपणा आणि सहजपणा दिसून येतो तो यामुळेच. आपल्या कार्यालयातील कनिष्ठ असो अथवा वरिष्ठ असो अंतरवैयक्तिक संबंधात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही, तर त्यांची ती सचोटी आहे. त्यांच्या कामकाजात नेहमी एक सकारात्मकता आणि उत्साह दिसून येतो तो यामुळेच. त्यामुळे सर या बाबतीत सुद्धा इतरांसाठी आदर्शवत ठरतात.
बऱ्याचवेळा हे संबंध जोडताना, ते वृद्धिंगत करत असताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते, मात्र सर ही कसरत लीलया पार पडतात. मी त्यांना सहज विचारले की एवढे मित्र आणि संबध यामुळे इतरांच्या तुमच्याबद्दल खूप अपेक्षा वाढत असतील तर ते अपेक्षाचे ओझे तुम्ही कसे पेलता?. यावेळी ते नम्रपणे म्हणतात की, मी दुसऱ्याला माझ्यापरीने शक्य होईल तेवढी मदत सकारात्मक राहून करतो आणि कधीही संवाद तोडत नाही. माझी जबाबदारी आणि माझे पद याला न्याय देवून मला शक्य होईल तेवढा मदतीचा हात इतरांना देण्यासाठी पुढे करत असतो. ते सांगतात की सामाजिक क्षेत्रात मात्र तारेवरची कसरत करावी लागते. विविध कार्यक्रम समारंभाची निमंत्रण परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, मार्गदर्शन याबाबत मला नेहमी विचारणा होते. मात्र मी सर्वप्रथम यशदामधील कामकाजला प्राधान्य देवून राहिलेल्या शिल्लक वेळेत स्व:तचा वेळ खर्ची घालून सर्वांना न्याय देण्याच्या शक्यतोवर प्रयत्न करत असतो.
तुम्ही जोगदंड सरांसमोर उभे राहा आणि सल्ला आणि मदत हवी आहे असे त्यांना सांगा. ते पहिले आपले काम समजून घेतील. मग स्व:तचे फोनबुक काढतील आणि आपल्याला न सांगता एक मोबाईल क्रमांक डायल करतील. समोरच्या व्यक्तीला ते काय बोलायचे ते बोलतील आणि तुम्हाला सांगतील की हा या अमुक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आहे तुम्ही त्यांना जावून भेटा, तुमचे काम होवून जाईल. हा विश्वास त्यांच्यामध्ये कुठून येतो, याचाही मला नेहमी प्रश्न पडतो. पण त्यांचा संदर्भ देवून आपण जेव्हा समोरच्याला भेटतो तेव्हा कळते की सर काय आहेत आणि इतरांना त्यांच्याबद्दल किती आदर आहे. अर्थात त्यांनी राज्यभर त्यांचे नेटवर्क तयार केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची अधिकारी मित्रमंडळी भेटतात.
यशदामध्ये सत्र संचालक म्हणून काम करत असतान सरांच्या प्रशिक्षण सत्रात मला अतिथि व्याख्याता म्हणून प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्याचा योगायोग अनेक वेळा आला. प्रशिक्षणात जेव्हा मी प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत हितगूज केली त्यावेळेस प्रशिक्षणार्थी यांनी एका सुरात सरांची स्तुती केली. निश्चितच आपला संवाद आणि वाणी यातून सर अनेक गोष्टी साध्य आणि शक्य करतात. प्रशिक्षणार्थी यांच्या ज्ञानात भर टाकणे फक्त येथेच न थांबता त्यांच्या दृष्टीकोनात बदल कसा होईल, याकडे सरांचा कटाक्ष असतो.
सरांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सुगंध हा असाच आसमंत दरवळत राहो. त्यांच्या विविधांगी कामकाजातून इतरांच्या जीवनात कायम सकारात्मक बदल घडून येवोत. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन यातून अनेकांच्या अंधाररूपी जीवनात प्रकाश निर्माण होवो. त्यांना हे समाजसेवेचे व्रत पार पाडण्यासाठी ऊर्जा, निरोगी आणि उदंड आयुष्य मिळो. जोगदंड सरांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा.