तिने जिंकलेल्या १०२ पदकांचा हिशोब ठेवण्यासाठी भारतीय अजून क्रिकेटपलीकडे गेलेच नाहीत…

विनीत वर्तक – अनेकदा माणसाने काय कमावलं यापेक्षा त्याने काय गमावलं किंवा त्याच्या हातून काय निसटलं याचीच चर्चा जास्ती होते. चांगल्या गोष्टींचा विसर लवकर पडतो आणि वाईट गोष्टींचं रवंथ नेहमीच सुरू असतं. वयाच्या २० व्या वर्षी आलेल्या एका कटू अनुभवाला जर संपूर्ण देशाने लक्षात ठेवून आयुष्यभर त्याची आठवण करून दिली गेली असेल तर तो क्षण आणि तो अनुभव त्या व्यक्तीसाठी किती कटू असेल याचा आपण विचार करू शकत नाही. त्या पराभवाचं शल्य सतत त्याला टोचत असेल आणि तो क्षण जर एका सेकंदाचा १०० वा भाग असेल तर त्याच दुखणं किती मोठं असेल! पण म्हणतात काही व्यक्ती याच्यापलीकडे असतात म्हणून ते आख्यायिका बनतात. हे सर्व सहन करून आजही आपल्या आयुष्याला लागलेला तो डाग पुसून टाकण्यासाठी कार्यरत असणारी भारताची ‘पायोली एक्स्प्रेस’ म्हणजेच ‘पिलावुल्लकांडी थेक्केपारंबिल उषा’ म्हणजेच पी.टी.उषा.

१९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील ४०० मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीत पी.टी.उषा हिचं ऑलिम्पिक पदक अवघ्या १ सेकंदाच्या १०० व्या भागाने हुकलं आणि भारताचं धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं ते आजतागायत. ही एक स्पर्धा सोडली तर पी.टी.उषा ने भारतासाठी काय केलं हे भारतीयांनाही माहित नसेल. कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने जिंकलेल्या १०२ पदकांचा हिशोब ठेवण्यासाठी भारतीय अजून क्रिकेटपलीकडे गेलेच नाहीत. आशियायी स्पर्धेत तब्बल १३ सुवर्ण पदकं आणि ३३ आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून धावण्याच्या ट्रॅकवर भारताचा तिरंगा एकहाती फडकवणारी ‘पायोली एक्सप्रेस’ आज एका पिढीपुरती मर्यादित राहिली आहे. ज्यावेळेस भारतातील स्त्रिया चूल आणि मूल यापलीकडे विचार करू शकत नव्हत्या, त्या काळात केरळ राज्यातून एक सावळी मुलगी शाळेतल्या स्पर्धेत येणाऱ्या काळाची पावले उमटवत होती.

असं म्हणतात, खरा हिरा ओळखायला पण चांगल्या रत्नपारखीची गरज लागते. पी.टी.उषाच्या बाबतीतही तेच झालं. तिच्यातील अंगभूत गुणांना ओळखण्याचं आणि त्यांना पैलू पाडण्याचं काम केलं ते ओ.एम. नांबियार यांनी. अतिशय गरीब घरात जन्माला आलेल्या आणि तिथून सुरू केलेला पी.टी. उषाचा प्रवास अनेक खेळाडूंना स्फूर्ती देणारा आहे. तिच्या मते ती कधीच पदकासाठी धावली नाही आणि कोणाला हरवण्यासाठी तर कधीच नाही, तर ती धावली फक्त स्वतःचे रेकॉर्ड मोडण्यासाठी. तिच्या शब्दांत, I never wanted to be an Olympian. All I wanted was to keep breaking my own record. I never competed to defeat anybody. —P. T. Usha

१९८८ च्या ऑलिम्पिक ( Olympics ) आधी तिला एक दुखापत झाली आणि तिला त्या स्पर्धेपासून मुकावं लागलं. एखाद्या खेळाडूला दुखापत होणं हा त्याच्या करिअर मध्ये होणारी सहज घटना असू शकते हे समजण्याची मानसिकता भारतीयांकडे नाही. या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. लोकांनी तिला शिव्या शाप दिले. कित्येक लोकांनी तिच्या घरावर दगडफेक केली. आधीच आपल्या दुखापतीमळे आत्मविश्वास गमावलेल्या खेळाडूला लोकांच्या अश्या उद्रेकाचा सामना करावा लागला असेल तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल. आपण कशाला खेळण्याच्या क्षेत्रात आलो इथवर पी.टी. उषाने स्वतःला प्रश्न विचारले. पण यातून पण बाहेर पडत तिने १९८९ आशियायी स्पर्धेत भाग घेताना ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई करून आपण आजही पायोली एक्सप्रेस असल्याचं दाखवून दिलं.

१९७६ ते २००० भारताच्या ट्रॅक फिल्ड ची राणी राहिलेल्या पायोली एक्सप्रेसने आपल्या निवृत्तीनंतरही भारताचा तिरंगा धावण्याच्या स्पर्धेत फडकवण्याचा चंग बांधला. २००२ साली केरळ इकडे तिने भविष्यातील धावपटू घडवण्याच्या दृष्टीने ऍथलेटिक स्कूल ( Athletic school ) सुरू केलं. यात १०-१२ वर्षांच्या मुलींना प्रवेश देण्यात येतो. आपल्या इतक्या प्रचंड अनुभवाचा फायदा या पुढे येणाऱ्या खेळाडूंसाठी पी.टी. उषाने मोफत उपलब्ध करून दिला आहे. तिची जी खंत होती की देशात प्रतिभेची कमतरता नाही, कमतरता आहे ती खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची. १९७६ साली जी अडचण होती ती आजही सारखीच आहे. त्यासाठीच तिने या शाळेची निर्मिती केली आहे. तिच्या याच शाळेतून भारतासाठी तिने ८ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटू ( मुली ) आणि २ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या धावपटू घडवल्या आहेत. तिचा भारताला धावण्याच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यासाठीचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे.

आज तिची आठवण येण्याचं कारण म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींनी तिची निवड भारताच्या राज्यसभेसाठी केली आहे. भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फडकवण्यात तिने दिलेल्या अमूल्य योगदानाचा सन्मान राष्ट्रपतींनी केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पी.टी.उषाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. तिने आपल्या जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपल्या जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांवर मात केली. आर्थिक अडचणी असोत, अपुऱ्या सोयी-सुविधा असोत किंवा आरोग्याच्या समस्या असोत, तिने त्यांचा प्रचंड आत्मविश्वासाने सामना केला आणि सर्वोच्च स्थानी भारताचा तिरंगा फडकावला.

आज पी.टी.उषा म्हटलं की तिच्याकडून एक शतांश सेकंदाने हरवलेल्या पदकाची आठवण होते पण प्रत्यक्षात तिचं कर्तृत्व यापेक्षा खूप मोठं आहे, ज्याचा सन्मान करायला खेदाने भारतीय विसरले असे मनापासून वाटते. आज हिमा दास असो, दूती चंद असो वा जिसना मॅथ्यू ( Hima Das, Duti Chand or Jisna Mathew ) असो. भारताच्या सर्व धावपटूंसाठी ती पडद्यामागून मार्गदर्शन करत आहे. आज भारतीय धावपटूंना विशेष करून महिला धावपटूंना जो सन्मान मिळायला लागला आहे त्यामागे पी.टी. उषाची तब्बल चार दशकांची मेहनत आहे. तिच्यासारख्या व्यक्तिमत्वाची राज्यसभेसाठी निवड नक्कीच कुठेतरी एक चांगली सुरूवात आहे असे मला मनापासून वाटते. येणाऱ्या काळात ती भारतीय खेळाडूंसाठी भारताच्या संसदेत एक हक्काचा आवाज असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

भारताच्या पायोली एक्सप्रेसला एका भारतीयाकडून एक कडक सॅल्यूट आणि तिच्या पुढल्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.