पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा कशी बदलली?

panipat : ‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. नेमकं हे युद्ध कसे झाले आणि या युद्धाचे काय परिणाम झाले हे आपण जाणून घेणार आहोत.

बाजीरावानंतर बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब हा पेशवा झाला. नादिरशाहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी नानासाहेब पेशव्याने प्रयत्न केले. अहमदशाह अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

उत्तरेतील परिस्थिती : अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्येजवळ स्थायिक झाले होते. या पठाणांना रोहिले म्हणत. रोहिलखंड या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. गंगा- यमुना नदयांच्या दोआबाच्या प्रदेशात रोहिल्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नबाबाने मराठ्यांना पाचारण केले. मराठ्यांनी रोहिल्यांचा बंदोबस्त केला.

अफगाणांशी संघर्ष : अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह
अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इ. स. १७५२ मध्ये त्याने पंजाब जिंकून घेतला. मुघल प्रदेशात अंदाधुंदी निर्माण झाली होती. मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे मुघलांना आवश्यक वाटले, म्हणून अयोध्येचा नबाब सफदरजंग याने मुघल बादशाहातर्फे मराठ्यांशी एक करार केला. या करारानुसार मराठ्यांनी रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. त्याच्या बदल्यात पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून मराठ्यांना चौथाई वसूल करण्याचे हक्क मिळाले.

नानासाहेब पेशव्याचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात मोहिमेवर गेला. दिल्लीजवळील मथुरा हे जाटांच्या सत्तेचे केंद्र होते. तेथे सूरजमल जाट हा प्रमुख होता. रघुनाथरावाने जाटांच्या प्रदेशावर आक्रमण केले. त्यामुळे जाट दुखावले गेले.

जयपूरचा राजा सवाई जयसिंग याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये जयपूरच्या गादीसाठी संघर्ष निर्माण झाला. त्यात मराठ्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे राजपूत नाराज झाले, म्हणून पानिपतच्या लढाईत जाट व राजपूत यांनी मराठ्यांना मदत केली नाही.

अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला : नजीबखान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. नजीबखानाच्या सांगण्यावरून अब्दालीने पुन्हा भारतावर स्वारी केली. त्याने दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इ. स. १७५८ मध्ये अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावरपर्यंत मोहीम काढली. मराठ्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही.

दत्ताजीचा पराक्रम : पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीबखानाचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीबखानाने त्यालावाटाघाटीत अडकवून ठेवले. अब्दालीशी संधान साधले. त्यास मदतीस येण्याची विनंती केली. नजीबखानाचा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले. या लढाईत त्याला वीरमरण आले.

सदाशिवरावभाऊची उत्तरेला रवानगी : अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबाने सदाशिवरावभाऊ यास उत्तरेला पाठवले.. त्याच्याबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाना होता. इब्राहिमखान गारदी हा तोफखान्याचा प्रमुख होता. नानासाहेबाचा थोरला मुलगा विश्वासराव व अनेक पराक्रमी मराठी सरदार या मोहिमेमध्ये होते.

पानिपतचा संग्राम : उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवरावभाऊने दिल्ली
जिंकून घेतली. मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. १४ जानेवारी, १७६१ रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. लढाईत विश्वासरावाला गोळी लागून तो ठार झाला. हे सदाशिवरावभाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला. त्याच वेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला, महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार पडले. अब्दालीला येथे राज्य करण्याचा कोणताच नैतिक हक्क नाही, अशी मराठ्यांची भूमिका होती. भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपतावर लढले.

पेशवा माधवराव : नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा माधवराव हा पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत मुलगा निजाम व हैदरअली यांचा बंदोबस्त केला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले.

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झालेला पाहून निजामाने पुन्हा मराठ्यांच्या विरोधात हालचाली सुरू केल्या. त्याने मराठी मुलखावर आक्रमण पैठणजवळील केले. माधवरावाने राक्षसभुवन निजामाला पराभूत केले. येथे हैदर अलीने राजाला बाजूला सारून म्हैसूरचे राज्य बळकावले होते. पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठी प्रदेशावर हल्ले केले. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील मोतीतलाव येथील लढाईत त्याला पराभूत केले. त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले.

मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना : पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहोचला होता. उत्तरेत मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना पाठवले. मराठी फौजांनी जाट, रोहिले व राजपूत याना पराभूत केले. बादशाह शाहआलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनर्स्थापित झाली. यामध्ये महादजी शिंदे याचा सिंहाचा वाटा होता.

इ. स. १७७२ मध्ये माधवराव पेशव्याचा मृत्यू झाला. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्याचा उल्लेख येतो. ग्रँट डफने माधवरावाबद्दल ‘मराठी साम्राज्याचे पानिपतवरील लढाईमध्ये झाले नाही एवढे मोठे नुकसान माधवरावाच्या अकाली मृत्यूने झाले.’ असे उद्गार काढले. या कर्तृत्ववान पेशव्याच्या मृत्यूमुळे मराठी राज्याची मोठी हानी झाली. या युद्धाबाबत पाठ्यपुस्तकातून देखील माहिती देण्यात आली आहे.

पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी 12 वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी 1773-74 मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.